अतिवृष्टीने नुकसान झालेली फुलशेती बागायती प्रमाणे नुकसान भरपाई द्या
तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात फुलाची लागवड करून फूल उत्पादन करीत आहेत. यावर्षी मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने फूल शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करतांना फुलशेती ही जिरायती म्हणून पंचनाम्यात नोंद घेण्यात आली आहे. फुलशेतीला बागायती प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी फूल उत्पादक शेतकर्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी फुलशेती करीत आहेत. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आपली उपजीविका भागवत आहेत. परतूर, बामणी, शेलवडा, वलखेड, सोयंजना, हरेराम नगर, सिरसगाव, श्रीष्टी, वरफळवाडी, चिंचोली, रेवलगाव, सालगाव, उस्मानापूर, वैजोडा, यासह आदि गावात शेतकरी फुलशेती करीत आहेत. मागील सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. फुलशेतीचे पंचनामा प्रशासनाने करतांना जिरायती शेती म्हणून पंचनाम्यात नोंद केली आहे. फुलशेती करतांना शेतकर्यांना बागायती शेती प्रमाणे मुबलक पाणी लागते. यामुळे फुलशेती जिरायती नोंद न घेता बागायती क्षेत्र म्हणून नोंद घेण्यात यावी. आणि बागायती प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी. तसेच फळबाग अतिवृष्टीने नुकसान झाल्याने ते वगळण्यात आले आहे. यांची नोंद घेत बहुवार्षिक पीक म्हणून फळबाग नोंद घेऊन शासनाने घोषित केलेल्या नुकसाने प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर संपत टकले, अंगद खालापुरे, पांडुरंग गाडगे, अनंता सुरुंग, प्रभाकर नळगे, बळीराम खालापूरे, प्रभाकर जाधव, आसराम सुरुंग,दिलीप निकम, देवीदास खालापूरे, तुळशीराम बिल्हारे, कैलास खालापुरे,गोरख गाडगे,अर्जुन नळगे, सुखादेव डव्हारे, यांच्यासह आदि फूल उत्पादक शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.