मराठवाड्यातील सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्नशील - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर,जालना, परभणी सह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान - लोणीकर यांची माहिती,शेतकऱ्यांसाठी आंदोलन हे काँग्रेसला उशिरा सुचलेलं शहाणपण, काँग्रेसचे शेतकऱ्यांविषयी "पुतणा मावशी"चे प्रेम शेतकरी चांगलेच ओळखून - लोणीकर
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
मागील अनेक दिवसांपासून जालना व परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात प्रचंड पाऊस सुरू असून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या अतोनात नुकसान झाले आहे परतीच्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास निसर्गाने हिरावून घेतला असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी आपण केंद्र व राज्य सरकारकडे प्रयत्नशील आहोत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केली.
केंद्र व राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे ६५ मिली पेक्षा अधिक पाऊस झाला असेल तर संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळणे क्रमप्राप्त ठरते त्यानुसार जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी ६५ मिली पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे नुकसान झाले आहे या भागात अतिवृष्टी नसली तरी देखील सततच्या पावसामुळे हे नुकसान झाले आहे त्यात जालना व परभणी या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून मंठा तालुक्यात आतापर्यंत सरासरी ११७७ मिली (१२६%)), परतुर तालुक्यात ११६३ मिली (१२५%), घनसावंगी तालुक्यात सरासरी १३२२ मिली (११५%), जालना तालुक्यात १२५७ मिली(१३६%), बदनापूर तालुक्यात १०८६ मिली (१२४%), भोकरदन तालुक्यात १०६२ मिली (१५३%), जाफराबाद तालुक्यात ९४२ मिली (१५४%), अंबड तालुक्यात १४६६ मिली (१२७%) पाऊस झाला असल्याचे देखील लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सत्ता असताना शेतकऱ्यांसाठी एक छदामही न देणाऱ्या महाविकास आघाडी सरकार आणि त्या सरकारमधील काँग्रेस पक्ष आता मात्र शेतकऱ्यांचा कैवारी असल्याप्रमाणे टाहो फोडतो आहे शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पुतना मावशीचे प्रेम दाखवत आहे परंतु सर्वसामान्य शेतकरी बांधवांना हे वेगळे सांगण्याची गरज नाही काँग्रेस पक्षाला शेतकऱ्यांविषयी आंदोलन करण्याचे हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका देखील यावेळी लोणीकर यांनी केली प्रत्यक्ष सरकार मध्ये असताना ०१ लाख रुपये, ५० हजार रुपये, २५ हजार अशा केवळ घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी अगोदर आपण सत्तेत असताना कोणत्या आश्वासनांची पूर्तता केली ते तपासून पहावे व नंतर शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घ्यावा असेही लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात काँग्रेसला सुनावले.
विद्यमान शिंदे-फडणवीस हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असून जालना परभणी सह मराठवाड्यातील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे देखील लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.