शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्या श्री. श्री .रविशंकर जालन्यात
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
शेतकऱ्यांना पाणीदार करण्यासाठी उद्या श्री. श्री .रविशंकर जालन्यात
परतुर-मंठा- वाटुर भागामध्ये पाण्याची असलेली कमतरता पाहून गेल्या दोन वर्षांपासून श्री. श्री. रविशंकर यांच्या अध्यात्म केंद्राच्या मार्फत आणि डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांच्या माध्यमातून 37 गावांमध्ये “जलतारा” प्रकल्प हाती घेण्यात आला होता. एका एकर मध्ये एक जलतारा या पद्धतीने शोषखड्डे खोदून त्यामध्ये शेतातील पाणी पुरवल्या गेले आणि आज ही शेती पाणीदार झाली आहे.या सकारात्मक बदलाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री. श्री. रविशंकर येत आहेत. नांदेड वरून हेलिकॉप्टरने ते वाटुर फाटा ते जयपूर रोडवर असलेल्या हेलिपॅड वर अकरा वाजता त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर दोन किलोमीटरवर असलेल्या जालना -मंठा रस्त्यावरील अध्यात्म केंद्रावर ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर काही वेळ त्यांचा राखीव ठेवण्यात आला असून चार वाजता ते तुळजापूरकडे प्रयाण करणार आहेत.
श्री. श्री. रविशंकर यांना झेड दर्जाची सुरक्षा असल्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परतुर पोलीस ठाणे अंतर्गत हा कार्यक्रम होत असल्यामुळे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाले हे आज पासूनच इथे ठाण मांडून आहेत. त्यांच्या मदतीला मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे देखील उपस्थित आहेत .दरम्यान वीस अधिकारी आणि 120 पोलीस कर्मचारी एवढा पोलीस बंदोबस्त या मेळाव्यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी दिली.
वाहतूक मार्गात बदल
मंठा -जालना रस्त्यावर असलेल्या या मेळाव्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी वाहतूक मार्गामध्ये बदल केला आहे. वाटुर कडून जालनाकडे येणारी वाहतूक लोणार मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे जड वाहन चालकांनी उद्याच्या दिवस या रस्त्यावरील प्रवास टाळावा.