माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
जुन्या आठवणींना उजाळा देत लाल बहादूर शास्त्री विद्यालय, परतूर 2004 च्या दहावी ‘ब’ बॅच तर्फे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा दिनांक 18.08.2024 रोजी हॉटेल कृष्ण मोती येथे आयोजित करण्यात आला होता. तब्बल 20 वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले होते. बालपणीच्या आठवणीत रमलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुललेले दिसत होते. उपस्थित सर्वांचे पारंपरिक पद्धतीने फेटे बांधून स्वागत करण्यात आले. शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. दिवंगत शिक्षक आणि दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
तद्नंतर माजी विद्यार्थ्यांनी आपला वैयक्तिक परिचय करून दिला. अनेकांनी आपल्या शैलीत तर कोणी मिश्किल पणे जुन्या आठवणींना उजाळा दिला. मूळचे परतूरचे परंतु सध्या नौकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले विद्यार्थी आपल्या जुन्या मित्रांच्या भेटीच्या ओढीने परतूर मध्ये परतले होते. या निमित्याने हॉटेल कृष्ण मोती येथे स्नेह्भोज कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
दुपारनंतर सर्वांनी शाळेला भेट दिली. तेथे सर्वांची गमतीदार पद्धतीने हजेरी घेण्यात आली. शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. परत एकदा भेटू असा संकल्प घेत सर्वांनी एकमेकांचा भावपूर्ण निरोप घेतला.