जाऊ देवाचिया गावा" मध्ये भक्ती, आध्यात्मिक रहस्यांचा शोध: डॉ. प्रमोद कुमावत पुस्तक प्रकाशन, सत्कार सोहळा थाटात संपन्न!
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
भक्ती कशी असावी, कशी नसावी असे आध्यात्मिक रहस्य, प्रश्नांचा शोध नारायण कांगणे यांनी वेदान्त, आध्यात्मिकता, श्रवण ,चिंतन, मनन, निदिध्यासन, या पायऱ्यांतून जे मिळवल ते "जाऊ देवाचिया गावा" मध्ये घेतला असून सदर ग्रंथ वाचनातून विवेकाची प्राप्ती होईल. असे मत आध्यात्मिक प्रबोधनकार ह. भ. प. डॉ. प्रमोद कुमावत यांनी केले. 

अनुभव प्रतिष्ठान च्या वतीने नारायण कांगणे लिखित "जाऊ देवाचिया गावा " या पुस्तकाचे रविवारी ( ता. 09) तळणी येथे डॉ. प्रमोद कुमावत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मसाप च्या केंद्रीय संचालिका,भाव कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यास गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर,,माजी सैनिक हरिभाऊ सोनवणे, भाष्यकार प्रा.प्रदीप देशमुख, अनुभव प्रतिष्ठानचे पंडितराव तडेगावकर,जगत घुगे, सरपंच सुनील कांगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नारायण कांगणे यांनी कर्मातून ईश्वर पूजा हे आध्यात्मिक ज्ञान ,सर्वात्मक देवाची कल्पना मांडण्याचा प्रयत्न केला असे सांगितले.
प्रा.प्रदीप देशमुख यांनी पुस्तकावर भाष्य केले.प्रास्ताविकात पंडितराव तडेगावकर यांनी पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेचा प्रवास नमूद केला.शिवाजी कायंदे यांनी लेखक परिचय दिला. सूत्रसंचालन जगत घुगे यांनी केले याप्रसंगी गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर,,माजी सैनिक हरिभाऊ सोनवणे, यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या वेळी पंचक्रोशीतील साहित्य प्रेमी, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जसे आहोत तसे आपल्या जगण्यावर प्रेम करता आलं पाहिजे. नारायण कांगणे यांनी शिक्षकी पेशाचा अविर्भाव न दाखवता आपले जगणे आध्यात्मिक चौकटीत बसवले. कवी, लेखकांनी खडकाळ माळरानावर नंदनवन फुलवण्यासाठी भावनिक ओलावा निर्माण करावा, अशी अपेक्षा भाव कवियत्री डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केली. सुमधुर कविता सादर करून त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
जाऊ देवाचिया गावा या पुस्तकातून लेखकाने अध्यात्मा विषयीचे चिंतन मांडले आहे. ईश्वराचे स्वरूप सर्वव्यापी असून स्वस्वरूपाचा अनुभव प्रत्येक जण घेऊ शकतो. स्थितप्रज्ञ व्यक्ती विरक्त असतो शिवाय तो इंद्रियांचा स्वामी असतो. लेखकाने पुस्तकाच्या माध्यमातून अध्यात्माचे अंतरंग उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याने भाष्यकार प्रा. प्रदीप देशमुख यांनी सांगितले. मन सारथी असते. ते आपल्याला हवे तिकडे नेऊ शकते म्हणून मनाचे स्वामी होणे गरजेचे आहे. असेही त्यांनी पुस्तकावर भाष्य करताना सांगितले.