सेवा फाउंडेशन च्या वतीने 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
दि 31 ऑगस्ट 2022 रोजी परतुर शहरातील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे सेवा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने परतुर तालुक्यातील गरजवंत ,होतकरू अश्या इयत्ता पहिली ते दहावी वर्गातील 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
सदरील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलचे संचालक सुबोध चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून परतुर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे ,नांदेड येथील विक्रीकर निरीक्षक रामदास श्रीरामे, परतुर पंचायत समितीचे गट समन्वयक कल्याण बागल, प्रा. प्रदीप चव्हाण ,श्रीमती अर्चना तनपुरे उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सदरील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कौठाळे साहेब म्हणाले की, परतुर येथील सेवा फाउंडेशन या शिक्षकाच्या ग्रुपचे सर्वप्रथम कौतुक करावे ते कमीच. कारण सदरील शिक्षक आपल्या ज्ञानदानाच्या कार्यासोबत सामाजिक जाणीव ठेवून त्यांच्या नजरेत आलेल्या होतकरू विद्यार्थ्यांचे परिस्थितीमुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये,या उदात्त भावनेने सुरू केलेले हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. तसेच विक्रीकर निरीक्षक श्रीरामे साहेब म्हणाले की,सदरील विद्यार्थ्यांनी या मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य प्रकारे वापर करून आपला शैक्षणिक स्तर उंचवावा व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने या फाउंडेशनच्या माध्यमातून चालू असणाऱ्या वर्गाच्या लाभ घेऊन ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात यशस्वी व्हावे अशी सदिच्छा व्यक्त केली .
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री महादेव काळे यांनी फाउंडेशनचे शैक्षणिक साहित्य वाटप व आर्थिक मदत वाटपाचे हे चौथे वर्ष असून यावर्षीपासून स्पर्धा परीक्षा ऑनलाईन क्लास घेण्याचा व इतर सामाजिक कार्य हाती घेण्याचा फाउंडेशनचा मानस असल्याचे नमूद करून काही दिवसात स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयाची मदत करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कंचरवार यांनी तर आभार ज्ञानेश्वर गायकवाड यांनी मानले.
सदरील कार्यक्रमासाठी फाउंडेशनचे राहुल डोंबाळे, सचिन सोनखेडकर, किशोर पवार, प्रभाकर बिराजदार, संतोष शेटकार सर, श्रीकांत आंबोरे ,सचिन भिसे, यमाजी देवकर, सिद्राम जाधव, हंसराज जाधव, चंद्रशेखर शेळके , संदीप वाकळे , मोतीराम बासटवार ,मोरे सर ,सतीश कदम, सदाशिव काळे, सतीश राठोड, श्रीरंग भोसले, प्रदीप साळवे ,बाळासाहेब कदम ,इत्यादीं शिक्षक मित्र व सेवा सदस्यांनी परिश्रम घेतले .
सदरील कार्यक्रमासाठी विद्यार्थी ,पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.