नूतन जिल्हा नियोजन समिती इमारतीमधील मुक्तीसंग्रामाच्याभित्तिचित्राचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लोकार्पण
जालना प्रतीनिधी नरेश अन्ना
दि. 17 (जिमाका) :- मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी महत्वपूर्ण योगदान दिले या सर्व थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या महान कार्याची आठवण व त्यांना श्रध्दांजली देण्याकरीता जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नूतन जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीमधील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोरील दर्शनिय भागात मुक्तीसंग्रामाचा इतिहास व वारसा सांगणारे भित्तिचित्राचे लोकार्पण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी माजी मंत्री अर्जून खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व महान हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल फार मोठे आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामात निजामाच्या जूलमी हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संपुर्ण आयुष्याची आहुती देवून मराठवाड्याला निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त केले. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला, तो सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे. सर्व थोर हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची जाणीव सदैव रहावी तसेच आजच्या पिढीला मुक्तीसंग्रामाचा महान इतिहास समजण्यास मदत व्हावी, या उद्देशाने मराठवाड्यात प्रथमच जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नाविण्यपूर्ण संकल्पनेतून तो नूतन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहाच्या आतील बाजूस हुबेहुब साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील भित्तीचित्राचे प्रत्यक्ष अवलोकनही पालकमंत्री श्री. सावे यांनी यावेळी केले. या नूतन वास्तुचे इंटेरिअर डिझाईन वास्तुविशारद जगदिश नागरे यांनी केले आहे.