जि प प्रा शाळा सातोना बु. येथे एचएआरसी संस्थेतर्फे प्रत्येकी १०१ पुस्तकांची आनंदी वाचन पेटीची अमूल्य भेट
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
मोबाईल आणि टीव्हीचा अतिवापर आणि वाढता स्क्रीन टाइममुळे शाळेतील व गावातील ग्रंथालये ओस पडली आहेत. त्या ग्रंथालयातील निराधार पुस्तके वाचक रुपी मायबापच्या प्रतीक्षेत आहेत अशा परिस्थितीत मुलांनी शाळेतील ग्रंथालयातील पुस्तकांशी मैत्री करून पुस्तक वाचनाचा आनंद घेण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांनी केले. ता. 16 जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सातोना बु. या शाळेत 'आनंदी वाचनपेटी' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेच्या वतीने सातोना बु. या शाळेला 123 वी आनंदी वाचनपेटी भेट देण्यात आली. या संस्थेमार्फत आतापर्यंत नांदेड, लातूर, जालना, हिंगोली, परभणी, बीड व पुणे जिल्ह्यातील 123 शाळांना ही आनंदी वाचन पेटी लोकसहभागातून भेट देण्यात आली आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, दिपकजी सोमाणी, मुख्याध्यापक डी के जाधव हे उपस्थित होते.
मार्गदर्शन एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक यांनी केले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांनी "ससा आणि कासव यांची गोष्ट मोबाईल पाहणारा आळशी ससा तर नियमितपणे वाचन व व्यायाम करणारा कासव यांच्या स्पर्धेत कासवाचा कसा विजय होतो हे कथेतून सांगतांना विद्यार्थ्यांना चांगले व्यक्तिमत्त्व व चरित्र घडविण्यासाठी 30 चांगल्या सवयींचा अंगीकार करून जीवन समृद्ध करावे, तसेच दररोज एक तास सहकुटुंब वाचन करावे, वाचलेले लिहिण्याचे व व्यक्त करण्याचे तसेच लेखकांना पत्र लिहिण्याचे आवाहन केले".
101 पुस्तकांच्या आनंदी वाचन पेटी मध्ये 101 पुस्तकांचा खजिना असून यामध्ये कथासंग्रह, कवितासंग्रह, महापुरुषांची चरित्रे,शास्त्रज्ञांची चरित्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मराठी,हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेत हे साहित्य आहे.
लोकसहभागातून दातृत्व : सेलू येथील स्व. सत्यनारायणजी मंत्री यांच्या प्रथम वर्ष पुण्यस्मरण निमित्ताने कुटुंबीयांनी दिलेल्या आर्थिक सहयोगातून जि प प्रा शाळा सातोना बु. येथे आनंदी वाचनपेटी भेट देण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले.
या प्रसंगी शाळेतील शिक्षक संजय खरात, राजूदास चव्हाण, माणिक बिडवे, राजेश धर्माजी, गजानन येन्नावार, सुप्रिया घेम्बड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सू्त्रसंचालन मुख्याध्यापक जाधव यांनी केलं. तर आभार प्रदर्शन गजानन येन्नावार यांनी केले.