कलावंत घडविण्यात शाळेच्या रंगमंचाची भूमिका मोठी पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे शास्त्री विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
परतूर, प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दि. 8 - शाळेच्या सांस्कृतिक मंचावर सुप्त कलागुणांना वेळीच वाव मिळाल्याने मराठी रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीला अनेक नामवंत कलावंत लाभले आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाप्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर भाग घ्यावा असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे यांनी केले.
शहरातील मोंढा विभागातील छत्रपती शिवाजीनगरमधील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द्रोपदाबाई आकात इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिलजा के.सीबी होत्या. तर यावेळी माजी उपनगराध्यक्ष विजय राखे,सनील सर,गटसमन्वयक कल्याण बागल, अंकुश शिंदे, सुरेश बहाड यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
सुरवसे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक सुप्त कलागुण असतात. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून हे कलागुण प्रदर्शित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असते.या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी निश्चितच घेतला पाहिजे असे सांगतानाच सुरवसे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करावा,परंतु शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमातही उत्साहाने सहभाग घ्यावा.शाळेच्याच व्यासपीठावरून मराठी रंगभूमीला, चित्रपट सृष्टीला अनेक मोठे कलावंत लाभले आहेत असेही सुरवसे म्हणाले.
====================
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळावा.पालकांनी देखील मुले मोबाईलमध्ये वेळ वाया घालणार नाहीत याबाबत सजग असावे असेही पोलीस निरीक्षक सुरवसे म्हणाले.
===================
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्येची देवता सरस्वती व संस्थेचे प्रेरणास्थान स्व. बाबासाहेब भाऊ आकात यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते यथोचित पूजन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यालयाचे पर्यवेक्षक राजकुमार राऊत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राऊत यांनी विद्यालयाने शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, स्पर्धा परीक्षा, विविध प्रकारच्या शालेय व सामाजिक उपक्रमात विद्यालयाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती दिली.
कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठी गर्दी होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस कलाविष्कार सादर केले.विविध कलाविष्कारांना उपस्थित प्रेक्षकांनी टाळयांच्या प्रचंड कडकडात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चिमुकल्या मुलांचे कलागुण पाहून प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले हे विशेष.