शर्मा चे सख्खे भाऊ-बहीण झाले डॉक्टर
परतूर प्रतिनिधी – कैलाश चव्हाण
शहरातील किरकोळ कपड्याचे व्यापारी गोपाल जगन्नाथ शर्मा यांनी प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यांच्या मुलांनी म्हणजेच डॉ. अभिजीत गोपाल शर्मा व डॉ. समीक्षा शर्मा या सक्ख्या भाऊ-बहीणीने हे स्वप्न यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
दोघांचेही प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण परतूर येथे झाले. त्यानंतर त्यांनी MGM School of Physiotherapy या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. पाच वर्षे अथक मेहनत, अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी फिजिओथेरपी (भौतिक उपचार) या वैद्यकीय शाखेतील पदवी प्राप्त केली.
फिजिओथेरपी ही होमिओपॅथी (BHMS), आयुर्वेद (BAMS), आणि अॅलोपथी (MBBS) प्रमाणेच एक स्वतंत्र वैद्यकीय शाखा असून, यात व्यायाम, उष्णता, बर्फ, कंपन (vibration), आणि इलेक्ट्रिकल उपकरणांच्या साहाय्याने उपचार केले जातात.
या क्षेत्रात डॉ. अभिजीत शर्मा हे परतूर तालुक्यातील पहिले पुरुष फिजिओथेरपिस्ट ठरले असून, हा संपूर्ण तालुक्यासाठी गौरवाचा क्षण आहे. समीक्षा व अभिजीत या दोघांवर शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर्स, नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या यशामुळे शर्मा कुटुंबाचे नाव उज्वल झाले असून, त्यांच्या जिद्दीने आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे अनेक नवोदित विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्त्रोत ठरले आहेत.