प्रतीक्षा संपली नगरपालीका,नगर पंचायतचे बीगूल वाजले
मुंबई-वृत्तसेवा । गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची आज घोषणा करण्यात आली असून यामुळे राज्याच्या नागरी भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींची मुदत 2021 च्या डिसेंबर महिन्यात संपली असतांना देखील कोरोना असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. तर, यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यामुळे निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यात आल्या. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2026 च्या अखेरपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका/नगरपंचायती; जिल्हा परिषद व पंचायत समित्या तसेच महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. यानुसार आज यातील पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज सायंकाळी चार वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राज्यातील एकूण 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलेल्या घोषणेनुसार, आजपासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीची अधिसूचना दिनांक 04 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या अर्ज भरण्याची मुदत ही 17 नोव्हेंबर पर्यंत राहणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत 21 रोजीपर्यंत राहणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी दिनांक 02 डिसेंबर रोजी मतदान होणार असून निकाल 03 डिसेंबर या तारखेला लागणार आहे.
यंदा देखील लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. आज मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा केल्यामुळे राज्यातील नागरी भागात रणधुमाळी सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Comments
Post a Comment