तुकाराम बीजे निमित्त कानडी येथे ह.भ.प. अर्जुन महाराज बादाड यांची प्रभावी कीर्तन सेवा; संत तुकाराम महाराजांच्या चरित्रातून भक्ती, समर्पण आणि पुरुषार्थाचा संदेश



 तळणी प्रतिनिधी रवी पाटील
संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम बीजे निमित्त कानडी येथे भाविकांच्या उपस्थितीत ह.भ.प. अर्जुन महाराज बादाड यांची अत्यंत भावस्पर्शी व विचारप्रवर्तक कीर्तन सेवा संपन्न झाली. या कीर्तनातून संत तुकाराम महाराजांचे चरित्र, त्यांचे निस्वार्थ भक्तिमार्ग, तसेच समाजाला दिलेला अध्यात्मिक संदेश यांचे प्रभावी विवेचन करण्यात आले.
कीर्तनाच्या प्रारंभी महाराजांनी संत परंपरेचा उल्लेख करत सांगितले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीला संतांच्या त्याग, समर्पण आणि भक्तीमुळे पावित्र्य लाभले आहे. संत ज्ञानेश्वरांनी अल्पवयातच ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ निर्माण केला, तर संत तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत अध्यात्माचा मार्ग पोहोचवला.
देहू नगरीत भजन-कीर्तनाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी विठ्ठलभक्तीचा प्रचार सुरू केला. कोणतेही पत्रक, जाहिरात किंवा प्रसिद्धी न करता केवळ कीर्तन आणि अभंगांच्या सामर्थ्याने त्यांचा संदेश खेड्यापाड्यांत पोहोचू लागला. त्यांच्या वाणीतील साधेपणा, भक्तीतील प्रामाणिकपणा आणि समाजजागृतीचा विचार यामुळे अल्पावधीतच तुकोबारायांची कीर्ती सर्वदूर पसरली.
मात्र समाजात काही विरोधकही निर्माण झाले. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड परिसरातील चिंतामणी देव नावाचे एक विद्वान ब्राह्मण होते. वेदांचा अभ्यास हा विशिष्ट मर्यादेत राहावा आणि एका कुणबी घराण्यातील शेतकरी असलेल्या तुकाराम महाराजांनी वेदांचा अर्थ सांगणे योग्य नाही, असा त्यांचा प्रारंभीचा विचार होता. परंतु नंतर त्यांनी स्वतः तुकोबारायांचे कीर्तन ऐकले आणि त्या दिव्य वाणीच्या प्रभावाने तेच तुकोबारायांच्या भक्तीत रमून गेले.

कीर्तनातून सांगितलेल्या प्रसंगात चिंतामणी देव रोज गणपतीची पूजा करत असत आणि त्यांना गणपतीचे प्रत्यक्ष दर्शन घडत असे, असे सांगितले जाते. मात्र एका दिवशी ते तुकोबारायांचे कीर्तन ऐकण्यासाठी गेले. कीर्तनातील भक्तिभाव, अध्यात्मिक विचार आणि तुकोबारायांची प्रभावी वाणी यामुळे ते इतके तल्लीन झाले की त्यांना वेळेचेही भान राहिले नाही. त्या दिवशी त्यांच्या पूजेच्या वेळी गणपती प्रकट झाले नाहीत. यावरून त्यांना जाणवले की खऱ्या भक्तीत अहंकाराला स्थान नसते आणि संतांच्या संगतीतच परमात्म्याचे खरे दर्शन घडते.

यावेळी महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी उद्धृत करत सांगितले—

धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ ।
पाण्यामध्ये गाथा तरल्या, विठोबा कृपेचा तो अर्थ
तुकाराम महाराजांच्या जीवनात समर्पण, त्याग आणि निस्वार्थ भक्ती यांचे अद्वितीय दर्शन घडते. त्यांनी स्वतःच्या भक्तीच्या सामर्थ्याने पांडुरंगाला आपलेसे केले. त्यांच्या भक्तीत कोणताही स्वार्थ नव्हता; उलट समाजकल्याणाचा आणि लोकजागृतीचा संदेश होता.
महाराज पुढे म्हणाले की, मनुष्याला जर खरा पुरुषार्थ प्राप्त करायचा असेल तर तुकोबारायांसारखी निस्वार्थ भक्ती, परोपकाराची भावना आणि संतवचनांवरील श्रद्धा अंगीकारावी लागेल. संत तुकाराम महाराजांचे अभंग आजही समाजाला सत्य, धर्म आणि सदाचाराचा मार्ग दाखवतात.
या कीर्तन सेवेला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिनामाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या घोषात कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात